भारतात क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जाहीर केलं. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेसकडून मात्र या कृतीचा निषेध केला जात आहे. “दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात मेजर ध्यानचंद यांचं नाव ओढलं आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

२००२पासून असा पुरस्कार आहेच

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी वा पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेल पुरस्कार २००२ पासून आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत. तसेच, “मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीव गांधींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे”, असं देखील आपल्या ट्वीटमध्ये सचिन सावंत म्हणाले आहेत.

 

सरदार पटेलांचं नाव छोटं करून…

दरम्यान, या ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांची स्टेडियमला दिलेली नावं देखील बदलण्याची मागणी केली आहे. “जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल, तर मोदी व जेटली यांची नावं ज्या स्टेडियमना दिली आहेत, ती बदलून दिग्गज खेळाडूंची नावं देण्यास सुरुवात करा. सरदार पटेलांचं नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचं नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा”, असं सचिन सावंत म्हणाले आहेत.

 

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील यावरून मोदींना खोचक टोला देखील लगावला आहे. “मला तर वाटलं होतं की ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील बदलून नरेंद्र मोदी खेलरत्न पुरस्कार ठेवतील. यालाच इंग्रजीमध्ये Megalomania म्हणतात!” असं देखील दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. आपण सर्वश्रेष्ठ असल्याची भावना मनात निर्माण होणे, याला मेगलोमॅनिया म्हणतात.

“मला तर वाटलं होतं ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव देखील…”, काँग्रेस नेत्याची खोचक प्रतिक्रिया!

यासोबतच मुंबईतील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेलं तुमचं नाव हटवून एखाद्या खेळाडूचं नाव तिथे दिलं जावं. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?”, असं आपल्या ट्वीटमध्ये निरुपम म्हणाले आहेत. “हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे”, असं देखील निरुपम म्हणाले आहेत.