08 December 2019

News Flash

राफेलला धर्माशी का जोडलं? काँग्रेसचा शस्त्रपूजेवर सवाल

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल फ्रान्सने पहिले राफेल फायटर विमान भारताला सुपूर्द केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत काल फ्रान्सने पहिले राफेल फायटर विमान भारताला सुपूर्द केले. मंगळवारी विजयादशमीचा मुहूर्त असल्याने राजनाथ सिंह यांनी राफेल स्वीकारताना विधिवत शस्त्रपूजन केले. राफेलच्या चाकाखाली दोन लिंब ठेवण्यात आली होती तसेच त्यावर ओम लिहिलेले होते. भारतात दसऱ्याला शस्त्रपूजनाची परंपरा आहे. राफेलचे केलेले शस्त्रपूजन भारतात काही जणांना खटकले आहे.

हवाई दलातील राफेलच्या समावेशाला धार्मिक रंग दिल्याने काँग्रेसने भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. राफेल हस्तांतरणाच्या सोहळयाचे भगवेकरण केल्याचा आरोप काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केला आहे. विजयादशमीचा राफेल विमानाशी संबंध येत नाही. तो एक सण आहे जो आपण सर्व साजरे करतो. त्याचा विमानाशी संबंध जोडण्याचे काय कारण? असा सवाल संदीप दीक्षित यांनी विचारला आहे.

राजनाथ सिंह यांनी नव्हे तर संरक्षण दलांनी हे विमान स्वीकारायला हवे होते. हीच या सरकारची मुख्य अडचण आहे. कामाशिवाय ते प्रत्येक गोष्टीला नाटकी रंग देतात असे संदीप दीक्षित म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केली टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा राफेलच्या शस्त्र पूजनावर खरमरीत शब्दात टीका केली आहे. “पीएमसी बँकेच्या खातेदारांनी दोन-दोन लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाजाला लावून ठेवायला हवेत. दोन लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतं तर तुमचे पैसे का नाही”, अशी बोचरी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी अर्थात पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेक खातेदारांना बँकेच्या व्यवहारांसाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यावरुन दोन लिंबू ठेवून पीएमसी बँक देखील सुरक्षित करावी असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

 

First Published on October 9, 2019 4:17 pm

Web Title: congress slams rafales shastra puja by rajnath singh dmp 82
Just Now!
X