News Flash

“युपीमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडतायत, कचऱ्याच्या गाडीतून मृतदेह नेले जातायत आणि योगी All Is Well म्हणतायत”

"खोटं बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय"

फाइल फोटो (सौजन्य : पीटीआय)

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार उडवला आहे. देशामध्ये रोज साडेतीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सर्वच राज्यांमधील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण पडल्याचं चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स, रुग्णवाहिका, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य सेवांची कमतरता जाणवत आहे. याच कारणामुळे मरण पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. असं असतानाच उत्तर प्रदेशमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र याच दाव्यावरुन काँग्रेसने एका बातमीच्या आधारे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर निशाणा साधालाय.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे योगी सरकारवर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशमध्ये कुत्रे मृतदेहांचे लचके तोडत आहेत. कचऱ्याच्या गाड्यांमधून मृतदेह वाहून नेले जात आहेत. मृतदेह नदीत फेकले जात आहे. असं असतानाही योगीजी तुम्ही सर्वकाही ठीक असल्याचं सांगत आहात. संत आणि महंत स्वप्नातही खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. मात्र तुम्ही सर्वकाही ठीक आहे, असा खोटा दावा करुन, असत्य बोलून योगीजी धर्माचा आणि राजधर्माचाही अपमान करताय,” असं सुरजेवाला म्हणाले आहेत.

सुरजेवाला यांनी या ट्विटसोबत दैनिक भास्करच्या बातमीची लिंक पोस्ट केली आहे. या बातमीमध्ये उत्तर प्रदेशमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो दाखवून राज्यातील करोना परिस्थिती किती गंभीर आहे यासंदर्भातील भाष्य करण्यात आलं आहे. पाहुयात काय आहेत या घटना…

कचरा गाडीतून नेला मृतदेह

शामली येथील जलालाबादमधील प्रमिला नावाच्या महिलाचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. प्रमिला या एकट्याच राहत असल्याने त्यांचा मृतदेह श्मशानभूमीवर पोहचवण्यासाठी कोणीच नव्हतं. आजूबाजूच्यांनाही प्रिमला यांच्या मृतदेहावर अंत्यस्कार करण्यासासंदर्भातील तयारी दाखवली नाही. शेजारच्या एका डॉक्टरांनी महानगरपालिकेला यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर कचरा नेणारी गाडी पाठवून प्रिमला यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या फोटोमुळे प्रशासनाबरोबरच एकूण व्यवस्थेवरच टीका केली जात आहे. या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींना शिक्षा देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

हातगाडीवर मृतदेह नेण्याची वेळ

योगी आदित्यनाथ ज्या गोरखपूरचे आहेत तेथील बडहलगंजमध्ये मंगळवारी १०० वर्षीय भागवत गुप्ता यांचं निधन झालं. त्यानंतर एका हातगाडीवर त्यांचा मृतदेह स्मशानभूमीवर घेऊन जाण्यात आला. गुप्ता हे त्यांच्या मुलीसोबत राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांना खोकला आणि ताप आला. डॉक्टरांनी त्यांना औषधं दिली मात्र त्याचा फायदा झाला नाही. मंगळवारी गुप्ता यांचं निधन झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठी त्यांच्या जावयाने अनेक ठिकाणी फोन केले मात्र रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे गुप्ता यांचा मृतदेह हातगाडीवरुन स्मशानात घेऊन गेले. तेथे दोन अनोळखी लोकांच्या मदतीने त्यांनी सासऱ्यांवर अंत्यस्कार केले.

कुत्रे तोडतात मृतदेहाचे लचके

तिसरी घटना ललितपूर येथील सुरईघाट स्मशानभूमीवरील आहे. या ठिकाणी येणाऱ्या मृतदेहांची संख्या इतकी आहे की एक चिता संपूर्ण जळण्याआधीच अन्य एक मृतदेह स्मशानभूमिमेध्ये अंत्यसंस्कारासाठी दाखल होतो. या सर्व गोंधळामध्ये काही मृतदेह पूर्ण जळत नाहीत. अशा अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे येथील भटके कुत्रे लचके तोडतानाचे चित्र स्मशानभूमीमध्ये दिसते. सरकारी आकडेवारीनुसार एका महिन्यामध्ये येथे ४८ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. मात्र येथील स्मशानभूमीवर रोज सात ते आठ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 3:17 pm

Web Title: congress slams uttar pradesh cm yogi adityanath regarding health facilities in state scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “B.1.617 हा करोनाचा उपप्रकार भारतीय नाही”, सर्व दावे निराधार असल्याचं केंद्र सरकारनं केलं स्पष्ट!
2 लसीकरण उत्सव साजरा केला, पण लसीची व्यवस्था नाही; प्रियांका गांधींची मोदींवर टीका
3 “…म्हणून भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती!” डॉ. फौचींनी सांगितलं कारण!
Just Now!
X