काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल प्रियंका गांधी-वढेरा यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची उत्सुकता अखेर बुधवारी संपुष्टात आली. प्रियंका यांची उत्तर प्रदेशच्या (पूर्व भाग) सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने हा बहुप्रतीक्षित ‘हुकमी एक्का’ बाहेर काढल्याचे मानले जाते. असं असतानाच या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रियंका गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपवण्याची मागणी केली जात होती. ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’, असे पोस्टरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावले होते. अखेर काल प्रियंका यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली असून त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये पदभार स्वीकारतील.

अनेक काँग्रेस नेत्यांनी या नियुक्तीचे स्वागत करत प्रियंकांचा सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केल्याने पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे. काँग्रेसने काल प्रियंकांच्या नावाची घोषणा केल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर तसेच रायबरेलीमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी प्रियंका यांच्याकडे निम्मा उत्तर प्रदेश (८० पैकी ४० जागा) सोपवला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सप-बसप यांच्या युतीत काँग्रेसला स्थान न मिळाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी निर्माण झाली होती. मात्र प्रियंका यांच्याकडे सूत्रे आल्याने काँग्रेस पूर्व उत्तर प्रदेशात भाजपच नव्हे, तर सप-बसप आघाडीवरही मात करेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत ‘प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ’ अशा घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता प्रियंका गांधीच्या नियुक्तीनंतर नवीन घोषणा तयार केल्या आहेत. कालच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते या नवीन घोषणा देताना दिसून आले. त्यापैकी काही घोषणांमध्ये प्रियंकांची तुलना थेट त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी करण्यात आली आहे तर काही घोषणांमध्ये प्रियंका थेट मोदींना आवाहन देतील असं कार्यकर्त्यांच म्हणणं आहे.

प्रियंकासंदर्भातील काही घोषणा

> प्रियंका गांधी आँधी हैं… दुसरी इंदिरा गांधी हैं

> दहन करो मोदी की लंका… बहन प्रियंका, बहन प्रियंका

> हिंद की शेरणी, हिंदोस्तान की आवाज… प्रियंका प्रियंका..

> अब आएगी उत्तर प्रदेश में काँग्रेस की जीत की आंधी, क्योंकि आ गई हैं प्रियंका गांधी

> अब आएगी असली आँधी जब लडेंगी प्रियंका गांधी

> प्रियंका गांधी आयी है नई रौशनी लायी है