अभिनेत्री आणि काँग्रेसच्या आयटी सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असला तरी सखोल चौकशीनंतरच अटक करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

राफेल करारावरुन काँग्रेस आक्रमक झाली असून राहुल गांधी यांनी ‘देश का चौकीदार चोर है’, अशा शब्दात मोदींवर निशाणा साधला. याचाच दाखला देत दिव्या स्पंदना यांनी देखील ट्विटरवरुन टीका केली होती. चोर पीएम चुप है, असे ट्विट त्यांनी केले होते.

दिव्या स्पंदना यांच्या ट्विटवर अनेकांनी आक्षेप घेतला. या ट्विटमधून देशाच्या पंतप्रधानांचा अपमान होत असून हे ट्विट डिलीट करावे, अशी मागणी काही युजर्सनी केली. मात्र, दिव्या यांनी ट्विट डिलीट केले नव्हते. या प्रकरणी सय्यद रिझवान अहमद यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दिव्या यांनी पंतप्रधानांचा अपमान केला असून त्यांनी लोकशाहीची देखील खिल्ली उडवली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.