काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय सीमांवर निर्माण झालेल्या समस्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेृतत्त्वातील रालोआ सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. चुकीची धोरणं आणि भोंगळ कारभार सीमांवरील समस्यांचं मूळ असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. या बैठकीत राहुल गांधी, मनमोहन सिंग यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते

“नियंत्रण रेषेवर चीनसोबत तणाव सुरु आहे. भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण आपली परिपक्व मुत्सद्देगिरी आणि निर्णायक नेतृत्व आपल्या प्रादेशिक अखंडतेचं संरक्षण करताना काय केलं जातयं याची माहिती देईल अशी अपेक्षा आहे,” असं सोनिया गांधींनी यावेळी सांगितलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींच्या वक्तव्याशी सहमती दर्शवताना जर सीमेवरील समस्या योग्य पद्धतीने हाताळली नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं.

पुढे बोलताना सोनिया गांधींनी सांगितलं की, “आज देश भयानक आर्थिक संकट आणि महामारीचा सामना करत आहे. यादरम्यान भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीमुळे देशात तणाव आहे. या दोन्ही संकटांसाठी रालोआ सरकारचे चुकीचे निर्णय आणि धोरणं कारणीभूत आहेत”.

“आपण याआधीही आर्थिक संकटावर चर्चा केली आहे. त्यानंतर हे संकट अजून वाढतच चाललं आहे. मोदी सरकार चांगले सल्ले ऐकण्यास नकार देत आहे. सध्याच्या घडील अनेक आर्थिक नियोजनांची गरज आहे. गरिबांच्या हातात थेट आर्थिक मदत दिली पाहिजे. हे सर्व न करता सरकार फक्त पॅकेजची घोषणा करत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती घसरत असताना आपल्याकडे सलग १७ दिवस इंधनाच्या दरात वाढ होत आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी तसंच पगार, मजुरी यामध्ये घट होण्याची भीती आहे. यामधून उभरण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. यामुळे सरकारने योग्य निर्णय आणि आर्थिक धोरणांचा अवलंब करण्याची गरज आहे,” असंही सोनिया गांधी यांनी सांगितलं आहे.