भाजपाच्या तुलनेत निधीच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या काँग्रेसने यंदाच्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ८२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. आंध्र प्रदेश, तेलंगण, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांची विधानसभा निवडणूक लोकसभेच्या बरोबरीने झाली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जितकी रक्कम खर्च केली त्यापेक्षा जास्त खर्च त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ७१४ कोटी खर्च केले होते. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची माहिती भाजपाने अजून सादर केलेली नाही. ३१ ऑक्टोंबरला काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक खर्चाची माहिती सादर केली. काँग्रेस ६२६.३ कोटी प्रचारावर तर उमेदवारांवर १९३.९ कोटी रुपये खर्च केले. अन्य पक्षांनी निवडणूक खर्चाची जी माहिती दिलीय त्यानुसार लोकसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसने ८३.६ कोटी, बसपाने ५५.४ कोटी, राष्ट्रवादीने ७२.३ कोटी आणि सीपीएमने ७३.१ लाख खर्च केले.

आमच्याकडे पैसे नाहीत असे काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदन यांनी मे महिन्यात वक्तव्य केले होते. २०१९ मध्ये काँग्रेसने प्रचारावर ६२६.३६ कोटी खर्च केले. ५७३ कोटी चेकने तर १४.३३ कोटी रोख रक्कमेच्या स्वरुपात दिले. केंद्रीय पक्ष मुख्यालयाकडून मीडिया प्रसिद्धी आणि जाहीरातीवर ३५६ कोटी रुपये खर्च केले. पोस्टर्स आणि निवडणूक साहित्यावर ४७ कोटी रुपये खर्च केले.

स्टार कॅम्पेनरच्या प्रवास खर्चावर ८६.८२ कोटी रुपये खर्च केले. काँग्रेसने छत्तीसगड आणि ओदिशामध्ये ४० कोटी, उत्तर प्रदेशात ३६ कोटी आणि महाराष्ट्रात १८ कोटी रुपये खर्च केले. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने १५ कोटी आणि केरळमध्ये १३ कोटी खर्च केले.