काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना मुलीवर बलात्कार करु अशी धमकी ट्विटरवरुन देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबईच्या गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना अज्ञात व्यक्तीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. चतुर्वेदी यांनी स्वतः मुंबई पोलिसांकडे ट्विटरद्वारे धमकीबाबत तक्रार केली होती.


यापूर्वी प्रियंका चतुर्वेदी यांना धमकी प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने मुंबई पोलिसांना कसून तपास करण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. धमकी देणाऱ्याची ओळख पटवा आणि त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून देण्यात आले होते.

@GirishK1605 या ट्विटर हँडलवरुन चतुर्वेदी यांना ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याच्या ट्विटर अकाऊंटचे नाव ‘जय श्री राम’ असे होते. मंदसौर बलात्कार प्रकरणी व्हायरल होत असलेल्या एका खोट्या मेसेजप्रकरणी चतुर्वेदी यांना धमकावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या काही वर्षांत महिलांना ऑनलाईन माध्यमातून बलात्काराच्या धमक्या देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्त्यांना अशा धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. नुकतेच राणा आयुब यांना अनेकदा ऑनलाइन माध्यमातून जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. उजव्या गटांकडून त्यांना अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत.

सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी चुकीच्या भाषेत ट्रोल करण्यात आले. यावर त्यांनी लोकांची मते जाणण्यासाठी थेट पोल घेतला आणि लोकांना आपले मत देण्याचे आवाहन केले. यावर स्वराज यांच्याविरोधात ४३ टक्के मते पडली तर ५७ टक्के लोकांनी त्यांना पाठींबा दर्शवला.

नुकतेच थॉमसन राउटर्स फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात महिलांच्या सुरक्षेबाबत भारत अधिक धोकादायक देश असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भारतात महिलांबाबत उघडपणे होत असलेल्या टीका टिपण्णीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे ठरले आहे.