नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध काँग्रेसने सोशल मिडीयावर ‘यू-टर्न’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘यू-टर्न सरकार’ नावाची ३३ पानी पुस्तिका काँग्रेस नेते अजय माकन यांनी सोमवारी प्रकाशित केली. यामध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये मोदी सरकारने कोणकोणत्या मुद्द्यांवर आपला शब्द फिरवला याची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक काळात भाजपने दिलेली आश्वासने आणि सत्तेत आल्यानंतर त्याच आश्वासनांना दिलेली बगल याच्या आधारावर काँग्रेसने सोशल मिडीयावर प्रत्येक मुद्द्याला अनुसरून मोदी सरकारवर हल्ला करण्यास सुरूवात केली आहे.  तसेच पुस्तिकेत नमूद करण्यात आलेले सर्व मुद्दे या आठवड्यात संसदेत उपस्थित करून मोदी सरकारची कोंडी करण्याचेही काँग्रेसने ठरवले आहे. यात प्रामुख्याने काळा पैसा, चीन-पाकिस्तानसंबंधीचे मुद्दे, रोख सबसिडी या मुद्दयांचा समावेश आहे. विमा क्षेत्रात ४९ टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणारे विधेयक व वस्तू-सेवा करासंबंधीच्या विधेयकाबाबतही सरकारने ‘यू-टर्न’ घेतल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी यावेळी म्हटले आहे.