नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे मावळते अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी तीन महिन्यांमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक होणार असून समविचारी पक्षांना बरोबर घेऊन युती सरकारचा पराभव करण्याचे आव्हान थोरात यांच्यासमोर असून त्या दृष्टीनेही भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

सोनिया-राहुल यांच्या भेटीनंतर थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून कठीण काळात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र सर्व नेत्यांमध्ये समन्वय साधून प्रदेश काँग्रेस काम करेल, असे थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस आघाडीला पन्नास जागादेखील मिळणार नाहीत असा दावा केला होता. हा दावा खोडून काढत राज्यात पुढील सरकार काँग्रेस आघाडीचेच असेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्याशी प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत बहुजन वंचित आघाडीशी आघाडी करण्याच्या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा झाली होती. बहुजन वंचित आघाडीला काँग्रेस आघाडीत समावून घेण्याची लवचीकता काँग्रेसने दाखवली आहे.

गेल्या आठवडय़ात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर, मनसेलाही काँग्रेस आघाडीत सहभागी करून घेता येऊ शकते, असे संकेत प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. मात्र अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची जागावाटपासाठी आज बैठक

मुंबई:आगामी विधानसभा निवडणुकीत कुणी किती जागा लढवायच्या याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिली. प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.