News Flash

काँग्रेसला लोकशाहीपेक्षा सरंजामशाहीच प्रिय, राहुल गांधींच्या ‘जागे’च्या वादात भाजपचे प्रत्युत्तर

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावेळी राहुल गांधी यांना प्रेक्षकांमध्ये सहाव्या रांगेत बसवण्यात आले.

Rahul Gandhi sixth row seat at R-Day parade : प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात सहाव्या रांगेत बसून राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत चर्चा करताना दिसले. यावेळी काही लोकांनी राहुल गांधी यांच्यासमवेत सेल्फीही काढले.

काँग्रेसला अजूनही लोकशाहीपेक्षा सरंजामशाही प्रिय आहे. त्यामुळेच राहुल गांधी स्वत:ला ‘सुपर व्हीव्हीआयपी’ समजतात आणि त्यांना आपल्याला इतर सगळ्यांपेक्षा पुढचे स्थान मिळावे, असे नेहमीच वाटते, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली. दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यावेळी राहुल गांधी यांना प्रेक्षकांमध्ये सहाव्या रांगेत बसवण्यात आले. यावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त करत पंतप्रधान आणि त्यांचे हीन राजकारण आता जगासमोर आल्याची टीका केली होती.

या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी म्हटले की, भारतातील सर्वात जुना पक्ष म्हणवल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या मानसिकतेत लोकशाहीची संकल्पना कुठेही दिसत नाही. राहुल गांधी यांना शिष्टाचाराप्रमाणेच सहाव्या रांगेत जागा देण्यात आली होती. मात्र, लोकांनी नाकारूनही हा देश आपल्या कुटुंबाच्याच नावावर चालतो, असे काँग्रेसला वाटते. परंतु, काँग्रेसची सत्ता असताना भाजपाच्या नेत्यांनाही अशीच वागणूक दिली जायची. तेव्हा भाजपाने कधीही आक्षेप घेतला नाही. मात्र, आता काँग्रेस ज्याप्रकारे टीका करत आहे ते वर्तन लोकशाहीच्या पूर्णपणे विरोधात आहे. आणीबाणी लादण्यात आलेल्या काळातही काँग्रेसची मानसिकता अशीच होती. राहुल गांधी यांनी सहाव्या रांगेत स्थान देण्यात आल्यावरून टीका करणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही, हे सांगावे, असेही जीव्हीएल नरसिंह राव यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात सहाव्या रांगेत बसून राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत चर्चा करताना दिसले. यावेळी काही लोकांनी राहुल गांधी यांच्यासमवेत सेल्फीही काढले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोबाइल आणण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासोबत काही लोकांनी सेल्फीही काढले. मात्र, राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान देणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हीन दर्जाचे राजकारण आहे अशी टीका काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली होती. काँग्रेस विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पहिल्या रांगेत स्थान दिले जाते, ही परंपरा आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा मोडली असेही सुरजेवाला यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2018 6:06 pm

Web Title: congress still believes in aristocracy not in democracy bjp on rahul gandhi sixth row seat at r day parade
Next Stories
1 काबूल पुन्हा हादरले; ९५ ठार
2 प्रजासत्ताकदिनी उत्तर प्रदेशात उसळलेला हिंसाचार दुसऱ्या दिवशीही कायम; जमावाने दोन बस पेटवल्या
3 मोदी सरकार खरंच लोकशाही पद्धतीने काम करते का?; रघुराम राजन यांचा सवाल
Just Now!
X