भाजपचे प्राबल्य असलेल्या मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभेची पोटनिवडणूकजिंकून काँग्रेसने भाजप आणि मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना जोरदार धक्का दिला आहे. बिहारपाठोपाठ मध्य प्रदेशात मिळालेल्या यशाने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. ईशान्येकडील मणिपूरमध्ये भाजपने विधानसभेच्या दोन्ही जागा जिंकून काँग्रेसवर मात केली.
रतलाम (राखीव) हा पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. १९८० पासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव केला होता, पण पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुमारे लाखभर मताने विजय मिळवून भाजपवर मात केली आहे. नरेंद्र मोदी यांची लाट मध्य प्रदेशातही संपुष्टात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे. बिहारमध्ये ४१ पैकी २७ जागा जिंकल्याने काँग्रेसला बळ मिळाले होते. यापाठोपाठ मध्य प्रदेश या भाजपच्या बालेकिल्ल्यात मिळालेल्या यशाने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. चौहान यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली त्याला १० वर्षे पूर्ण होत असतानाच भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याने मुख्यमंत्र्यांना फटका बसला आहे. मणिपूर विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवून काँग्रेसला धक्का दिला. दोन्ही मतदारसंघ गेल्या वेळी काँग्रेसने जिंकले होते. ईशान्य भारतात प्रवेश करण्याच्या दिशेने भाजपची आगेकूच सुरू झाली आहे.