नरेंद्र मोदी सध्या खाऊंगा, खिलाऊंगा और चोरो का बचाऊंगा असं वागत असून आम्ही इंग्रजांचा सामना केला तर मग तुम्ही काय आहात असं म्हणत काँग्रेसने मोदींना आव्हान दिलं आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून वाटाघाटी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या टीमकडून (इंडियन निगोशिएटिंग टीम) अंतिम करण्यात आला नाही. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 12 आणि 13 जानेवारी 2016 रोजी हा निर्णय घेतला असा दावा केला आहे.

अजित डोवाल वाटाघाटी करण्यासाठी नेमलेल्या टीमचा भाग नव्हते किंवा सुरक्षाविषयक संबंधित कॅबिनेट समितीकडून अधिकृत नेमणूक करण्यात आली नव्हती असंही रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कार्यालयाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.

काँग्रेसने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चौकीदार उल्लेख करत चौकीदाराची चोरी रंगेहाथ पकडली गेली असल्याचं म्हटलं. यावेळी नरेंद्र मोदींनी राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. 36 विमानांच्या खरेदीसाठी मोदींनी जास्त पैसे मोजले. मोदींनी जास्त किंमत दिल्याने देशाच्या तिजोरीवर भार आला असंही रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी म्हटलं.

नरेंद्र मोदींनी पदाचा दुरुपयोग केल्याचं स्पष्ट दिसत आहे. एफआयआर दाखल करुन तपास करण्याची वेळ आली आहे असंही रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी सांगितलं. देशासमोर मोदींचा भ्रष्टाचार आणणाऱ्यांना जेलमध्ये पाठवलं जात आहे आणि चोरांना संरक्षण दिलं जात आहे असा आरोप काँग्रेसकडून कऱण्यात आला.