भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’द्वारे देशाच्या एक हजार ठिकाणी जमलेल्या लोकांशी संवाद साधल्याला आठवडा उलटत नाही तोच या ‘नमो चाय’विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘रागा (अर्थात राहुल गांधी) दूध’ वितरीत करायला सुरुवात केली
आहे.उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील कार्यकर्त्यांनी ही शक्कल प्रत्यक्षात आणली आहे. चहा हा आरोग्यासाठी चांगला नाही, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत, असा संदेश देत कागदी कपातून गोरखपूरमधील गोलघर या वर्दळीच्या भागात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दूध दिले जात आहे.
गोरखपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद जमाल म्हणाले की, मोदींच्या प्रत्येक प्रचारतंत्राला जशास तसे उत्तर देण्याचा आमचा निर्धार आहे. सध्या केवळ गोरखपूर शहरात या दुधाचे वाटप सुरू आहे. लवकरच विभाग पातळीवर ते दिले जाईल आणि त्यासाठी रोज ५० लीटर दूध पुरविले जाईल. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी या मोहिमेबाबत प्रतिक्रिया दिली नसली तरी खाजगीत अनेकांना ही कल्पना आवडली आहे.
समाजवादी पक्षानेही आधी मोदी यांची ‘चायवाला’ म्हणून खिल्ली उडवली होती. सपचे राज्यसभा सदस्य नरेश अगरवाल यांनी तर ‘चहावाला कधीच पंतप्रधान होऊ शकत नाही,’ अशी शेरेबाजी केली होती. आता मात्र या पक्षाने आपल्या ‘देश बचाओ, देश बनाओ’ या मोहिमेत अनेक चहाविक्रेत्यांना सहभागी करून घेतले आहे. चहाच्या टपऱ्यांवर या मोहिमेचा प्रचार केला जात आहे.
भाजपने या दोन्ही पक्षांवर प्रचारतंत्रचोरीचा आरोप केला आहे. आमचा ‘चाय पे चर्चा’ हा लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहे तर या पक्षांचा केवळ लोकप्रियतेसाठी आहे, असे भाजप प्रवक्ते विजय बहाद्दूर पाठक म्हणाले.