सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात सध्या राजधानी दिल्लीसह देशभरात विविध प्रमुख शहरांमध्ये तीव्र निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणच्या आंदोलनास हिंसक वळण लागून जाळपोळीच्या घटना देखील घडल्या आहेत.  या सर्व पार्श्वभूमीवर उद्या (२२ डिसेंबर) काँग्रेस पक्षाच्यावतीने दिल्लीतील ‘राजघाट’ येथे दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे.  या धरणे आंदोलनात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत.

तर, सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केलं आहे. ‘CAA’ आणि ‘NRC’ बाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. देशात सध्या वेगळं चित्र दिसत आहे. देशासमोरचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारनं जो कायदा केला त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान बांगलादेशातून आलेल्या लोकांसंबंधी हा कायदा आहे. एका विशिष्ट नावाच्या लोकांवर त्यांचं लक्ष केंद्रीत झालंय. सुधारित नागरिकत्व कायद्याला संसंदेतही विरोध केला. कायद्यामुळे सामाजिक धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील ‘CAA’ आणि ‘NRC’ ला जोरदार विरोध केलेला आहे.  भाजपाला बहुमत मिळालं याचा अर्थ असा होत नाही की ते मनमानी करतील. भाजपात हिंमत असेल तर त्यांनी सीएए आणि एनआरसी या दोन्ही कायद्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली मतदान घ्यावं. त्यामध्ये भाजपा अपयशी ठरली तर त्यांनी सत्ता सोडावी.” भाजपा त्यांच्या समर्थकांना आंदोलनांमध्ये घुसवून दंगे घडवणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एवढंच नाही तर CAA आणि NRC हे दोन्ही कायदे पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.