गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात सलग सत्ता उपभोगणारा काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच रस्त्यावर निदर्शकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. भाजपप्रणीत रालोआ सरकारने जमीन अधिग्रहण कायद्यात केलेल्या सुधारणांविरोधात २५ फेब्रुवारीला जंतर-मंतरवर निदर्शने करणार असल्याची घोषणा पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी केली. अर्थात या आंदोलनाचे नेतृत्व राहुल गांधी करणार की नाही, यावर मात्र निश्चिती होऊ शकलेली नाही.
लोकसभा निवडणूक व त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभव पत्करल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेतून केंद्राविरोधात निदर्शने करणार आहे. जमीन अधिग्रहण कायद्यातील सुधारणांविरोधातील संघटना व व्यक्तींनी आमच्यासोबत यावे, असे आवाहन करीत माकन यांनी अप्रत्यक्षपणे अण्णा हजारे यांच्याशी हातमिळवणीची शक्यता फेटाळून लावली. माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी यापूर्वीच केंद्र सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी अलीकडेच भट्टा-परसोलमध्ये जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. येत्या रविवारी जयराम रमेश गौतम बुद्धनगरमध्ये शेतकरी महापंचायत घेणार आहेत. विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन २५ फेब्रुवारीला जंतर-मंतरवर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असे माकन यांनी स्पष्ट केले. जमीन अधिग्रहण कायद्यात केंद्र सरकारने जाचक अटींची तरतूद केली. संसदेत मंजूर करण्याऐवजी अध्यादेश आणला. सुधारित कायदा आदिवासी, शेतकरी, जंगलविरोधी असल्याची टीका अजय माकन यांनी केली.