बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांच्यापासून चार हात लांब राहणं पसंद केलं आहे. हीच संधी साधत काँग्रेसने चंद्रशेखर यांच्याशी हातमिळणी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. एकीकडे ‘बुआ’ म्हणण्यावरुन मायावती यांनी चंद्रशेखर यांना सुनावलं असताना, काँग्रेसने मात्र चंद्रशेखर यांना पश्चिम उत्तर प्रदेशातील दलित-मुस्लिमांचा नेता म्हटलं आहे.

काँग्रेस आणि चंद्रशेखर दोघांचाही भाजपाचा पराभव करण्याचा प्रयत्न आहे असं काँग्रेसचे दिग्गज नेता इमरान मसूद बोलले आहेत. पुढे ते म्हणालेत की, ‘मी पहिल्या दिवसापासून चंद्रशेखर यांच्यासोबत आहे. आम्हा दोघांचं एकच लक्ष्य आहे आणि शत्रूही…तो म्हणजे भाजपा’.

१४ सप्टेंबरला चंद्रशेखर उर्फ रावण यांची सहारनपूर जेलमधून सुटका करण्यात आली. गतवर्षी जून महिन्यात त्यांना अटक करण्यात आली होती. रात्री २ वाजून ४० मिनिटांनी त्यांची सुटका करण्यात आली. सहारनपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जखमी झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये सुटका करण्यात येणार होती, मात्र त्याआधीच त्यांना सोडून देण्यात आलं.

मायावती यांनी शब्बीरपूर गावाचा दौरा करताना भीम आर्मीवर टीका करत आपला काही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. दुसरीकडे काँग्रेसने चंद्रशेखर यांच्या सुटकेचं समर्थन केलं. चंद्रशेखर यांनीदेखील दलित – मुस्लिमांच्या एकतेचा उल्लेख करत काँग्रेसला आपला भाऊ म्हटलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि भीम आर्मी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.