पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या हर हर मोदीचा मुकाबला काँग्रेस ‘बोल बम’ या नाऱ्यानं करणार आहे. २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजपानं आक्रमक प्रचार करताना, अच्छे दिन आनेवाले है, घर घर मोदी, अब की बार मोदी सरकार अशा तुफान लोकप्रिय झालेल्या नाऱ्यांप्रमाणेच हर हर मोदी हा शिवभक्तांना साद घालणारा नारा दिला होता. याच धर्तीवर भगवान शंकराशीच जवळिक दाखवणारा बोल बम हा नारा काँग्रेस निवडणूक प्रचारात वापरणार आहे.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींच्या प्रचारफेऱ्यांमध्ये तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये कार्यकर्ते ‘बोल बम’च्या घोषणा देणार आहेत. विशेष म्हणजे मोदी व गांधी दोघेही स्वत:ला शिवभक्त म्हणवतात. उत्तराखंडमधल्या केदारनाथ या भगवान शंकराच्या मंदिराच्या सानिध्यात मोदींनी ध्यानधारणा केल्याचे सांगितले जाते, तर राहूल गांधींनी हिंदुंना पवित्र असलेली व भगवान शंकराचं स्थान मानलं जाणारी कैलाश मानसरोवराची यात्रा नुकतीच केली.

भगवान शंकराची स्तुती करताना हर हर महादेव म्हटलं जातं, त्याची भाजपानं हर हर मोदी अशी घोषणा केली तर शिवभक्त ‘बोल बम’ ही घोषणाही देतात, जिचा आधार काँग्रेस घेणार आहे. भाजपाच्या ‘हर हर मोदी’चा मुकाबला ‘बोल बम’ने करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष कमल नाथ यांनी काँग्रेस सत्तेत आला तर सगळ्या पंचायतींमध्ये गोशाळा उभारेल असं आश्वासन दिलं आहे. मध्यप्रदेशमध्ये ज्या मार्गानं भगवान राम, सीता व लक्ष्मण ज्या मार्गानं गेले त्या रामपथ गमन मार्गावर जाण्याची घोषणाही काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

काँग्रेस हा पक्ष केवळ मुस्लीमांसाठी झटणारा असल्याचा शिक्का पुसण्यासाठी हिंदुंना जवळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेण्यात आल्याचे व त्या दिशेने काँग्रेसमधलं सगळ्या स्तरावरील नेतृत्व जात असल्याचे दिसत आहे. बोल बम ही घोषणा याच दिशेने जाण्याचा व शिवभक्त हिंदुंना चुचकारण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.