त्रिपुरात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. प्रदेशाध्यक्ष प्रद्योत देबबर्मन यांनी आज (मंगळवार) पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस हायकमांडवर टीका केली आहे. शिवाय भ्रष्टचारी लोकांना पक्षात मोठाल्या पदांवर घेतले जात असल्याचाही त्यांना आरोप केला आहे. पक्षातील अंतर्गत राजकारणाला आपण वैतागलो असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर देबबर्मन यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, आज मी माझ्या दिवसाची सुरूवात खोटारड्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी न बोलता करत आहे. त्यामुळे मला आज झोपेतून उठल्यानंतर निवांतपणा अनुभवायला मिळत आहे. आज मला याची चिंता नाही की, माझा कोणता सहकारी माझ्या पाठीमागे मलाच धोका देईल. आज मला कार्यकर्त्यांची जमावजमव करण्याची गरज नाही, शिवाय मला पार्टी हायकमांडकडून हे देखील ऐकावे लागत नाही की, भ्रष्टचारी लोकांना पक्षात उच्च पदावर बसवले जावे.  प्रद्योत यांनी हे देखील सांगितले की, मी या सर्व गोष्टींचा सामना करण्याचाही प्रयत्न केला, मात्र मी हारलो. मी या सर्वांविरोधात जिंकलो तरी कसा असतो, कारण सुरूवातीपासूनच मी एकटाच होतो.

मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यातच देबबर्मन यांना काँग्रेसने त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. प्रद्योत यांचे वडील किरीट बिक्रम किशोर माणिक्य देबबर्मन व त्यांच्या आई बिभु कुमारी देवी अनेकदा लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला त्रिपुरात मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले होते. त्या अगोदर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस एकही जागा  जिंकू शकलेली नव्हती.

देबबर्मन यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत, आसामप्रमाणे त्रिपुरात एनआरसी लागू करण्याची मागणीही केली होती. तेव्हापासून ते पक्षांतर्गत विरोधाचा सामना करत होते. एवढेच नाहीतर त्यांच्यावर याचिका परत घेण्यासाठी दबावही टाकला जात होता, याला कंटाळून त्यांनी आपण राजीनामा देऊ असा इशाराही दिला होता.