News Flash

‘पीएनबी’ घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप

२०१७ मध्ये मोदी सरकारच्या काळातील हा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

| February 18, 2018 04:59 am

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

काँग्रेसच्या काळातील घोटाळा : सीतारामन; पंतप्रधानांनी मौन सोडावे -राहुल गांधी यांची मागणी

कोटय़वधी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळाप्रकरणी काँग्रेस जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. काँग्रेसच्या काळात हा घोटाळा घडला असा आरोप संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे, तर काँग्रेसनेही सरकारवर प्रतिहल्ला चढवला आहे. पंतप्रधानांनी मौन सोडावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

२०१७ मध्ये मोदी सरकारच्या काळातील हा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. नीरज मोदी व त्याचा भागीदार मेहुल चोक्सी फायदेशीर ठरेल अशा पद्धतीने पंजाब नॅशनल बँकेने व्यवहार केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले. नीरव मोदी जरी परदेशात गेला असला तरी, त्याच्याविरोधात सरकार कारवाई करून जेरबंद करेल असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या काळातच हे व्यवहार घडले. देशाबाहेर जाण्यास आम्ही कोणालाही मदत केलेली नाही, काँग्रेस याप्रकरणी अफवा पसरवत असून, घोटाळेबाजांना त्यांनी नेहमीच संरक्षण दिले असा आरोप भाजपने केला आहे. व्यवस्था वाकविणे, सत्तेत असताना पदाचा दुरुपयोग करणे या गोष्टी केल्या. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात घोटाळे का झाले याचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा, भाजपवर त्यांचे आरोप सुरू आहेत, अशी टीका सीतारामन यांनी केली. उलट नीरव मोदीच्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. २०१३ मध्ये अलाहाबाद बँकेच्या सरकारच्या संचालकाने ‘गीतांजली जेम्स’मधील घोटाळ्याबाबत आक्षेप घेतले होते. मात्र त्या संचालकालाच राजीनामा देण्यास भाग पाडल्याची टीका भाजपने केली आहे.

‘केंद्राने जबाबदारी झटकली’

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. केंद्र सरकार सातत्याने आपली जबाबदारी झटकत असून मोदी यांनी आपल्या कृत्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला विनाशाच्या वाटेवर नेले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. हा घोटाळा कसा घडला आणि आपण त्याबाबत कोणती पावले उचलली आहेत ते मोदी यांनी स्पष्ट  करावे. बँकेच्या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी याच्याबाबत काय आणि कसे घडले आणि मोदी त्याबाबत कोणती पावले उचलत आहेत ते त्यांनी समोर येऊन स्पष्ट करावे, असेही गांधी म्हणाले. नीरव मोदी याच्याशी आपले वैयक्तिक संबंध असल्याच्या वृत्ताचे आणि त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याच्या वृत्ताचे गांधी यांनी खंडन केले. या महत्त्वाच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी भाजप हा आरोप करीत असल्याचे गांधी म्हणाले. पंतप्रधानांनी नोट बंदी केली आणि हा सर्व पैसा त्यांनी बँकिंग यंत्रणेत वळविला, त्या सार्वजनिक पैशांमधील २० हजार कोटी रुपये घेऊन नीरव मोदी देशाबाहेर पसार झाला, असा आरोपही  गांधी यांनी केला. परीक्षेच्या वेळी तणाव न घेण्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले, मात्र या घोटाळ्याला जबाबदार कोण ते मोदी देशाला सांगू शकलेले नाहीत. संरक्षणमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री या घोटाळ्याबाबत भाष्य करीत असताना या प्रकाराला जबाबदार असलेले पंतप्रधान आणि अर्थमंत्री त्याबाबत कोणतेही भाष्य करीत नसल्याचेही गांधी म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांवर कायदेशीर कारवाई : काँग्रेस

चुकीचे आणि खोटे आरोप करणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दिवाणी आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. माझे कुटुंबीय नीरव मोदीच्या कंपनीमध्ये समभागधारक असल्याचे सीतारामण यांचे आरोप मूर्खपणाचे आहेत. या बिनबुडाच्या आरोपांसाठी संरक्षणमंत्र्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. परळमधील अद्वैत होल्डिंग कंपनीची जागा ही जुनी असून, यात अनेक वर्षांपूर्वी फायरस्टोन कंपनीने ती भाडय़ाने घेतली आहे. त्यामुळे अद्वैत आणि मोदीच्या फायरस्टोन कंपनीत माझ्या कुटुंबाचा काहीही रस नाही. परळमधील कमला मिल्समध्ये लागलेल्या आगीनंतर फायरस्टोन कंपनी बंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 4:59 am

Web Title: congress trying to mislead people in pnb bank scam says bjp
Next Stories
1 साहित्यिकांची संमेलनाकडे पाठ!
2 निर्भीड विचारांची सरकारला भीती
3 मराठी वाङ्मयाला इतिहास आहे, परंपरा नाही!
Just Now!
X