९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. #जन की बात असा मथळा देत एक व्यंगचित्र काँग्रेसने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली हे मंगळागौरीतला एक पारंपारिक खेळ खेळताना दिसत आहेत. त्यांनी दोघांनी हात उंचावून एकमेकांच्या हाती दिले आहेत आणि जनता त्यांच्या हाताखालून पळते आहे असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. ते या खेळात मग्न आहेत आणि विजय मल्ल्या विदेशात पळताना दाखवला आहे. मी तुम्हाला सांगून चाललो आहे, तुम्ही तुमचा खेळ सुरु ठेवा असेही विजय मल्ल्या जेटलींना सांगत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

खेल रहे हो कैसा खेल? भगौडें से क्यों दूर है जेल? #JanKiBaat असा ट्विट करत काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेसचे हे व्यंगचित्र भाजपाला चांगलेच झोंबणारे आहे. काही दिवसांपूर्वीच विजय मल्ल्याने मी देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती असे सांगितले होते. ज्यानंतर अरूण जेटलींनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. तर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विजय मल्ल्या खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. तरीही राहुल गांधी यांनी जेटलींना विजय मल्ल्या देश सोडून पळणार होता हे ठाऊक होते अशी टीका केली. आता व्यंगचित्र ट्विट करत काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.

दरम्यान आजच मुंबई पोलिसांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक करू नये, तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे असे आदेश सीबीआयकडून देण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा केला आहे. इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या गोपनीय कागदपत्रांद्वारे हा खुलासा झाला आहे. मल्ल्याला ताब्यात घेण्याची गरज नाही, पण तो भारतात आल्यावर आम्हाला गुपचूप माहिती द्या असे आदेश सीबीआयकडून मुंबई पोलिसांना पत्राद्वारे देण्यात आले होते.