राफेल करारावरून सुरु झालेले आरोप प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचे एक व्यंगचित्र काँग्रेसने ट्विट केले आहे. या व्यंगचित्रात मोदी सांगतात मला साधासुधा चौकीदार नाही तर अंबानींचा दरबान समजा. अनिल अंबानी त्यांना पाहून पुढे जात आहेत असेही या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. ‘राफेल उड न पाया दोस्त हुआ है मालदार, देश की जनता जान गयी है, चुप क्यों है चोरो का सरदार’ असा मथळा देऊन काँग्रेसने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींचा फायदा करून दिला. त्यांनी या करारात त्यांना हवे तसे फेरबदल केले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. एवढेच नाही तर त्यांना आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चोरांचे सरदार आहेत अशीही टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. मी साधासुधा चौकीदार नाही तर अंबानींचा दरबान आहे असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. एकीकडे राफेल विमान दुसरीकडे रिलायन्स समूहाची बॅग घेतलेले अंबानी आणि त्यांना सलाम करणारे दरबानाच्या वेशातले मोदी असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता यावरून भाजपा पुन्हा एकदा काँग्रेसला प्रत्युत्तर देणार हे नक्की आहे.

याआधी कर्जबुडव्या विजय मल्ल्याबाबतही काँग्रेसने एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. आता पुन्हा एकदा राफेल कराराच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली आहे. यावरून पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेस यांच्यात ट्विटर वॉर रंगू शकते.