पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं म्हणजे फेकाफेकी असते त्यांच्याकडे चांगलं भाषण करण्याची कला आहे. मात्र त्यात असत्य आणि थापा मारणं हे ठासून भरलेलं असतं. अशी भाषणं करणं तुम्हालाही जमेल जर तुम्ही हा व्हिडीओ पाहिला असं म्हणत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर आले की आपले अन्नदाता अनिल अंबानी यांचे स्मरण करतात. त्यानंतर मंचावर उपस्थित कालियाचे म्हणजेच अमित शाह यांचे आभार माना. त्यानंतर तुमच्या भाषणांमध्ये जमतील तेवढ्या थापा मारा. भाजपाशासित राज्यात तुम्ही मुख्यमंत्री असाल तर तुमच्या भाषणात किमान ५ ते १० वेळा खोटं बोलणं आवश्यक आहे.

तुम्ही जर केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय स्तरावरचे नेते असाल तर मात्र तुमच्या भाषणात किती खोटं असावं याला काहीही प्रमाण नाही. तुम्ही कितीही फेकाफेकी करू शकता असेही या व्हिडीओत काँग्रेसने म्हटले आहे. राफेल करार करून एका रात्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० हजार कोटींचा घोटाळा केला अशी टीकाही काँग्रेसने केली आहे. तुम्हाला चांगलं भाषण करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा मग उच्च स्तरावरचं खोटं कसं बोलायचं याचं प्रशिक्षण तुम्हाला मिळेल असाही टोला या भाषणात लगावण्यात आला आहे.

खोटं बोला आणि रेटून बोला, तुमच्यासमोर जी जनता बसली आहे तिला खुशाल मूर्ख समजा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषण करण्याची शैली अगदी अशीच आहे असंही काँग्रेसने ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. भाषण करताना सुरूवात हळू आवाजात करा, मंद स्वरात करा मात्र त्यानंतर आता ज्याप्रमाणे इंधनाचे दर वाढत आहेत त्याच वेगाने तुमचा आवाज चढता ठेवा त्यामुळे तुमच्या बोलण्यात जोर येईल तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे फेकाफेकी करू शकाल असेही काँग्रेसने म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्यांना हा व्हिडीओ चांगलाच झोंबला तर आश्चर्य वाटायला नको.