केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी ‘आप’चे कौतुक केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी त्यांना झोडपून काढल़े  त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे सरचिटणीस आणि दिल्लीचे प्रभारी शकील अहमद यांनीही ‘आप’वर उपरोधिक टीका करीत रमेश यांनी केलेली स्तुती पुसून टाकण्याचा प्रयत्न केला़
‘दिल्लीतील ‘आप’चे शासन पाहिल्यानंतर मला लालूप्रसाद यांच्या बिहारमधील राजवटीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण होत़े  त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या पुतळ्यासमोर घेतलेली शपथ, भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे आवाहन, जनता दरबार, केशरचना आणि लहान मुलांना आंघोळ घालणे आदी .. ’, अशी ट्विप्पणी शकील अहमद यांनी केली आह़े  ‘लालूराज’ ही संज्ञा अविकसनशीलता, बेबंदशाही अशा पद्धतीच्या राजवटीसाठी राजकीय क्षेत्रात वापरण्यात येत़े
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे, असे विधान गुरुवारी द्विवेदी यांनी केले होत़े  त्यानंतर अहमद यांनी ही ट्विप्पणी केली आह़े  तसेच काँग्रेसच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रक अनिल शास्त्री यांनीही जयराम यांच्या वक्तव्यावर ट्विप्पणीद्वारे टीका केली आह़े  ‘जयराम यांनी केलेली ‘आप’ची स्तुती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात जाणारी आह़े  त्यांनी शासनाच्या कामगिरीबाबत बोलले पाहिजे, असे ते म्हणाल़े