नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या वक्तव्यांबद्दल दाखल झालेल्या बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी मुंबईतील एका न्यायालयापुढे हजर झाल्याच्या दिवशीच, या संघटनेने वारंवार ‘भारतविरोधी कारवायांमध्ये’ भाग घेतल्याचा आरोप करणारा एक व्हिडीओ काँग्रेसने गुरुवारी ट्विटरवर पोस्ट केला.

संघ काय आहे हे तुम्हाला माहीत असेल, तर पुन्हा विचार करा. ब्रिटिशांशी निष्ठा व्यक्त करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे आणि महात्मा गांधी यांची हत्या करणे यांसह भारतविरोधी कृत्यांमध्ये संघ वारंवार सहभागी झाला आहे, असे ‘आरएसएस व्हर्सेस इंडिया’ या हॅशटॅगने काँग्रेसने ट्विटरवर नमूद केले.

स्वातंत्र्ययुद्धापासून भारतीयत्वाच्या चिन्हांपर्यंत सर्व गोष्टींना संघाने नेहमीच विरोध केला आहे. स्वातंत्र्ययोद्धे जेव्हा ब्रिटिशांशी लढत होते, तेव्हा संघ ब्रिटिशांपुढे झुकत होता. ‘भारताच्या संकल्पनेला’ विरोध करणे हेच संघाचे धोरण राहिले आहे, असेही ट्वीट पक्षाने केले.

डॉ. के. ब. हेडगेवार यांनी संघाला सत्याग्रहात सहभागी न होण्याचा आदेश दिला. संघाच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांना ब्रिटिश सिव्हिक गार्डमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. संघाने भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग न घेतल्याबद्दल त्यांच्या ब्रिटिश मालकांनी त्यांचे अभिनंदन केले होते. संघाने आपल्या राष्ट्रध्वजालाही विरोध केला. नथुराम गोडसे यांनी गांधीजींना गोळ्या घालून ठार मारले, असा दावा ‘आरएसएस फॉर डमीज’ अशा शीर्षकाच्या एका मिनिटाच्या व्हिडीओत काँग्रेसने केला आहे.

राहुल यांचे धैर्याचे प्रियंकांकडून कौतुक

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असून या निर्णयाचा आपण आदर करतो, असे स्पष्ट करून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी राहुल यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे. राहुल गांधी यांनी आपले राजीनामापत्र ट्वीटरवर टाकल्यानंतर त्याला प्रियंका यांनी ट्वीट करून उत्तर दिले. तू दाखविलेले धैर्य मोजक्याच लोकांकडे आहे, तुझ्या निर्णयाचा आपण आदर करतो, असे प्रियंका यांनी म्हटले आहे.