X

मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मध्ये दिवसाला फक्त ४०० नोकऱ्या: राहुल गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्याच योजना पुढे नेल्या.

चीनमध्ये दिवसाला ५० हजार नोकऱ्यांची निर्मिती होते. पण मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मध्ये दिवसाला फक्त ४५० नोकऱ्यांची निर्मिती होते, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी गुरुवारी अमेठीत पोहोचले असून ते तीन दिवस मतदार संघाचा दौरा करणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी अमेठीत भाजपने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असतानाच या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. दौऱ्यात राहुल गांधींनी भाजप आणि नरेंद्र मोदींचा समाचार घेतला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्याच योजना पुढे नेल्या. सत्तेवर आल्यावर मनरेगा योजनेवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींनी काही महिन्यांमध्येच या योजनेचे कौतुक केले. काँग्रेस पक्ष जनतेला डोळ्यासमोर ठेवून योजना तयार करते, असे  राहुल गांधींनी सांगितले. ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) ही काँग्रेसची संकल्पना आहे. आम्ही जीएसटी विधेयक तयार करताना जनता आणि छोट्या दुकानदारांचे मत जाणून घेतले होते. जनतेने जीएसटीत १८ टक्क्यांपेक्षा जास्त कर नसावे असे सांगितले होते. आम्ही त्यानुसारच जीएसटी विधेयक तयार केले. पण भाजपने जीएसटीत जनतेचे आणि छोट्या दुकानदारांचे मत जाणून घेतले नाही. त्यांना जीएसटी समजलेच नाही,  असा चिमटाही त्यांनी काढला.

देशभरात बेरोजगारी वाढत आहे. भारतात दररोज ३० हजार तरुण रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडतात. यापैकी फक्त ४०० तरुणांनाच रोजगार मिळतो. हे मोदी सरकारच्या मेक इन इंडियाचे भीषण वास्तव असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी २ कोटी तरुणांना रोजगार मिळेल असे आश्वासन दिले, मात्र मोदींना हे आश्वासन पूर्ण करण्यात अपयश आले. यामुळे तरुणांमध्ये असंतोष खदखदत असल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकारने जीएसटीसंदर्भात छोट्या दुकानदारांशी चर्चा केली पाहिजे असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. नरेंद्र मोदींनी कारणे देण्याऐवजी किंवा काही जण निराशा पसरवत असल्याचा आरोप करण्याऐवजी अपयश मान्य करावे असेही ते म्हणालेत. कृषी क्षेत्र संकटात असून शेतकरी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain