गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सोशल मीडियाचे सामर्थ्य लक्षात आले आहे. त्यामुळेच राहुल गांधी सध्या ट्विटरवर अतिशय सक्रीय झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पंतप्रधान मोदींना ट्विटरवर चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत. राहुल गांधीचे ट्विट्स सध्या सर्वाधिक रिट्विट होऊ लागले आहेत. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींना पिछाडीवर टाकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर ३ कोटी ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर राहुल गांधींचे १ कोटी ९० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. राहुल गांधींचे फॉलोअर्स मोदींच्या तुलनेत कमी असले, तरी गेल्या काही आठवड्यांपासून राहुल यांच्या ट्विट्सची मोठी चर्चा आहे. पंतप्रधान मोदी निवडणुकीतील यश, सणांच्या शुभेच्छा, विविध दौरे, सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय यांच्याबद्दल ट्विट करत असताना राहुल गांधींनी थेट मोदींनाच लक्ष्य केले आहे. गुजरातमधील विकासाचा मुद्दा, अमित शहांच्या मुलाच्या कंपनीच्या उलाढालीत अचानक झालेली वाढ यावरुन राहुल यांनी मोदींना अनेकदा टोला लगावला आहे.

सप्टेंबरमध्ये राहुल गांधींच्या ट्विटला मिळणाऱ्या रिट्विटची सरासरी २,७८४ इतकी होती. याच महिन्यात मोदींच्या ट्विट्सना साधारणत: २,५०६ इतके सरासरी रिट्विट्स मिळाले. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल ट्विट केले होते. ट्रम्प यांनी पाकिस्तानबद्दल नरामाईची भूमिका स्वीकारल्यावर, ‘मोदीजी, डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मिठी मारुन या,’ असे खोचक ट्विट राहुल यांनी केले होते. हे ट्विट तब्बल १९ हजारांहून अधिकवेळा रिट्विट झाले. याशिवाय अमित शहांच्या मुलाच्या कंपनीची उलाढाल वर्षभरात १६ हजार पटींनी वाढताच, ‘मोदीजी, अमित जय शहा ‘जादा’ खा गया. आप चौकीदार थे या भागीदार?,’ असा सवाल राहुल यांनी विचारला होता. या ट्विटलाही मोठ्या प्रमाणात रिट्विट्स मिळाले होते.

जुलै महिन्यात काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी दिव्या स्पंदना यांच्याकडे देण्यात आली. यानंतर राहुल गांधींच्या अकाऊंटवरुन होणाऱ्या ट्विट्समध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. ‘त्या त्या वेळी चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर लक्ष देऊन आम्ही ट्विट करतो. त्यामुळे अनेकजण आमच्यासोबत जोडले गेले आहेत,’ असे स्पंदना यांनी सांगितले. २०१५ मध्ये राहुल गांधी यांनी त्यांचे पहिले ट्विट केले होते. यानंतर १२ महिन्यांनी त्यांनी दुसरे ट्विट केले. त्यामुळे फॉलोअर्सची संख्या विचारात घेतल्यास राहुल गांधी मोदींपेक्षा खूप मागे आहेत. मात्र आता ते ट्विटरवर चांगलेच सक्रीय झाले आहेत.