काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज, शनिवारी गोरखपूर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्याबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादही होते. यावेळी आझाद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ यांनी पाच वेळा गोरखपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. आता ते राज्याचे मुख्यमंत्रीही आहेत. मात्र, त्यांनी या रुग्णालयासाठी काहीच केले नाही, अशी टीका त्यांनी केली.

गोरखपूर येथील बाबा राघव दास रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत ७० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारवर कडाडून टीका केली होती. या घटनेची जबाबदारी घेऊन आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, तसेच भाजपने सत्ता सोडावी, अशी मागणी काँग्रेससह विरोधकांनी केली होती. त्याचवेळी या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली होती. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ही घटना घडली नसल्याचे स्पष्टीकरण सुरुवातीला देण्यात आले होते. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. काँग्रेसने या घटनेवरून भाजप सरकारला घेरले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल यांनी आज गोरखपूरचा दौरा केला. रुग्णालयात मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

दरम्यान, राहुल यांच्या गोरखपूर दौऱ्याआधी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. अखिलेश यादव यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. दिल्लीतील ‘युवराज’ला आणि लखनऊत बसलेल्या पुत्राला वेदना समजणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला होता. मी गोरखपूरला ‘पिकनिक स्पॉट’ होऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले. गेल्या १२ ते १५ वर्षांत तत्कालीन सरकारने भ्रष्टाचार करून उत्तर प्रदेशला उद्ध्वस्त करून टाकले आहे, असा आरोपही त्यांनी केला.