काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशातील हजारो पत्रकारांचे त्यांचे मत मांडण्याचे अधिकार हिरावून घेण्यात आले असून प्रत्येकाची मुस्कटदाबी केली जात आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी सुरु केलेले नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आता नव्याने बाजारात दाखल होणार आहे. सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बंगळुरुमध्ये हा सोहळा पार पडला. मी टीकाकारांचे स्वागत करतो असे सांगत राहुल गांधी म्हणाले, एखाद्या व्यक्तीला माझ्याविषयी किंवा पक्षाविषयी गाऱ्हाणे मांडायचे असल्यास ते सहजपणे त्यांचे मत मांडू शकतात. सत्याला वाचा फुटलीच पाहिजे. तुम्ही गप्प बसू नका असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीयपातळीवरही हेच चित्र दिसायला हवे असे सांगत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी यांनी नॅशनल हेराल्डला मुलाखतही दिली आहे. यात राहुल गांधी यांनी बेरोजगारी आणि अन्य मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. पण मोदींनी देशाला गेल्या पाच वर्षात सर्वाधिक बेरोजगारी दिली. दरवर्षी फक्त दोन लाख रोजगार निर्माण करुन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

बेरोजगारीमुळे समाजातील असंतोष वाढू लागला आहे का असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, समाजातील वाढता असंतोष ही धोक्याची घंटा आहे. गावातून शहरात स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढत आहे. पण शहरातील नोकरी नाही. शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधांची वानवा असल्याचे त्यांनी नमूद केले. या असंतोषाचा फायदा जनतेमध्ये द्वेष आणि हिंसा निर्माण करण्यासाठी घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण द्वेष आणि हिंसेमुळे रोजगार निर्माण होत नाही असा टोला त्यांनी मोदी आणि संघाला लगावला.