राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

नवी दिल्ली : ‘राष्ट्र मंच’ने आयोजित केलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी ‘निवडणूक आखणीकार’ प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा भेट घेतली. दोन आठवड्यांतील ही तिसरी भेट असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या राजकीय नेते व बुद्धिजीवींच्या चर्चेत पवार सहभागी झाले होते. मात्र, ही बैठक भाजपविरोधातील तिसऱ्या आघाडीला बळ देण्यासाठी नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर २४ तासांमध्ये प्रशांत किशोर यांनी पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेऊन तासभर चर्चा केली.

‘राष्ट्र मंच’च्या बैठकीपूर्वीही सोमवारी या दोघांची सुमारे दोन तास भेट झाली होती. पवारांशी ही नियमित भेट असून अशा गाठीभेटी पुढेही होत राहतील, असे किशोर यांनी सांगितले होते. ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीत भाजपविरोधात समविचारी सर्व पक्षांना समावून घेण्यावर विचारमंथन झाले. मंचच्या वतीने आणखी बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यातून पर्यायी राजकीय रणनीती बनवली जाण्याची शक्यता मानली जाते. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या सातत्याने होणाऱ्या भेटींकडे पाहिले जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजयाची रणनीती आखण्यात मदत केली होती. या राज्यातील निकालानंतर महिन्याभरात प्रशांत यांनी पवारांची मुंबईत तीन तासांहून अधिक चर्चा केली होती. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीआधी आणि नंतरही या भेटी सुरू राहिल्याने संभाव्य तिसऱ्या आघाडीसंदर्भात अजूनही तर्क केले जात आहेत. अन्य राजकीय पक्षांनी निवडणुकीतील रणनीतीसाठी प्रशांत किशोर यांचा सल्ला घेतला असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही मदत मागितलेली नाही, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.