News Flash

राहुल गांधी विदेशातून परतले; निवडणूक कामाला लागले!

पक्षाच्या नेत्यांची बोलावली बैठक

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी.

नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर नवीन वर्षाची सुट्टी परदेशात घालवण्यासाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोमवारी रात्री मायदेशी परतले आहेत. सुट्टीवरून आल्यानंतर ते लगेच निवडणूक कामाला लागले आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा त्यांनी घेतल्याचे समजते.

राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ३१ डिसेंबरला ते परदेशात सुट्टी घालवण्यासाठी जात असल्याचे ट्विट करण्यात आले होते. पण ते नक्की कुठे जाणार आहेत, हे त्यात स्पष्ट केले नव्हते. राहुल सुट्टीवर गेले असतानाच, निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या. त्याचवेळी पंजाब काँग्रेसने निवडणूक जाहीरनामाही घोषित केला होता. पंजाबमध्ये पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी झटणारे पंजाबमधील काँग्रेसचे नेते राहुल यांची आतुरतेने वाट पाहात होते. राज्यातील ४० मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर करायची असल्याने ते राहुल यांच्या प्रतीक्षेत होते. तत्पूर्वी दिल्लीतील पक्षातील एका नेत्याने नाराजी व्यक्त केली होती. इतर पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक प्रचाराला सुरूवात केली असताना, आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र, सुट्टीवर गेले आहेत, अशी प्रतिक्रिया त्या नेत्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे माजी नेते आणि क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अमृतसर पूर्व मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तशी घोषणा पंजाबमधील काँग्रेसच्या अध्यक्षांनी आधीच केली आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, त्यावेळी राहुल गांधी हे परदेशात होते. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षात टोकाचा वाद निर्माण झाला होता. आता काही प्रमाणात हा वाद निवळला असला तरी, काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत ‘हातमिळवणी’ करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या भेट होण्याची शक्यता आहे. त्यात आजच राहुल गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. निवडणुकांच्या दृष्टीनेही ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंबंधी रणनिती ठरवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते उद्या राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:39 pm

Web Title: congress voice president rahul gandhi back in delhi after foreign holiday to meet party leaders today
Next Stories
1 VIDEO: व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावेळी अपघात, वायूदलाचा जवान जखमी
2 देशातील ४१,००० पेट्रोल पंपांवर पेटीएमद्वारे व्यवहाराची सुविधा
3 नोटाबंदीनंतर सहकारी बँकांनी काळा पैसा पांढरा केला-आयकर विभाग
Just Now!
X