काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी राजस्थान आणि गुजरातमधल्या पूरग्रस्तांची भेट घेतली. राहुल गांधी जेव्हा गुजरातमधल्या बनासकांठामध्ये पोहचले तेव्हा त्यांच्या कारवर काही जणांनी दगडफेक केली, मात्र यामध्ये राहुल गांधींना कोणतीही इजा झाली नाही. भाजपच्या गुंडांनी ही दगडफेक केली असा आरोप काँग्रेसनं केला आहे. मोदी सरकारनं पूरग्रस्तांसाठी काहीही केलं नाहीये अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. देशातल्या ज्या राज्यांमध्ये पूर आला आहे तिथल्या जनतेला पंतप्रधानांनी वाऱ्यावर सोडलं आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राजस्थानात जाऊनही  राहुल गांधी यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. केंद्र सरकारनं राजस्थान आणि गुजरात या दोन्ही राज्यातल्या पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन हवेत विरलं आहे. पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहचलेलीच नाही. काँग्रेस पक्ष सगळ्या पूरग्रस्त लोकांसोबत आहे आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी पूरग्रस्तांना दिलं आहे. पूरग्रस्तांना मदत मिळाली नाहीये आणि ज्यांना नुकसान भरपाई द्यायची होती त्यांनाही ती अद्याप मिळालेली नाही, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

बनासकांठामध्ये राहुल गांधी पोहचले तेव्हा त्यांना पूरग्रस्तांनी काळे झेंडेही दाखवले. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी बजावलं की कोणालाही अडवू नका, हे लोक घाबरलेले आहेत, पुरामुळे त्रासले आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांविरोधात त्यांना चीड येणं स्वाभाविक आहे. काळे झेंडे दाखवले तरीही दाखवू देत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. दरम्यान राहुल गांधी यांच्या कारवर पूरग्रस्तांनी नाही तर भाजपच्या गुंडांनी दगड फेकले आहेत अशी टीका आर. एस. सुरजेवाला यांनी ट्विटरवर केली आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरातचा हवाई दौरा केला होता तसंच गुजरातच्या मदत आणि बचाव कार्यसााठी ५०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. इतकंच नाही तर आसामसहीत इतर राज्यांसाठी २३५० कोटींचं पॅकेज जाहीर केलं  आहे. असं असलं तरीही लोकांपर्यंत मदत पोहचलेली नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.