केंद्रीय राज्यमंत्री व माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांच्या वादग्रस्त विधानावरून लोकसभेत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. दादरी प्रकरण तसेच हरयाणात एका दलित कुटुंबातील लहान मुलांच्या हत्याप्रकरणी सिंह यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी घोषणाबाजी करीत काँग्रेस खासदारांनी कामकाजात व्यत्यय आणला. विशेष म्हणजे या वेळी सभागृहात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ‘रस्त्यावर कुत्रा मेल्यास त्याची जबाबदारीही सरकारची आहे का?’, असा प्रतिप्रश्न सिंह यांनी केला होता. तेव्हापासून उठलेले वादळ अद्याप शमलेले नाही. उलट या मुद्दय़ावरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. मात्र या विषयावर गेल्या चार दिवसांपासून चर्चा होत असून केंद्रीय गृहमंत्र्यांनीदेखील सविस्तर उत्तर दिल्याचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी विरोधकांना सुनावले; मात्र त्यांचे समाधान झाले नाही.