भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली यूपीए सरकारवर निशाणा साधला. चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही, मग देश विकणारे पंतप्रधान बनण्यास पात्र आहेत का, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
छत्तीसगढमधील विधानसभा निवडणुकीसाठी रायगढमध्ये झालेल्या जाहीर सभेत मोदींनी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली.
ते म्हणाले, चहा विकणारी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही, असे यूपीएमधील नेते म्हणतात. मग देश विकणारे पंतप्रधान बनण्यास पात्र आहेत का? यूपीएचे नेते देशातील गरिबांची थट्टा करीत आहेत. गरीब या थट्टेचा बदल घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींवर चिखलफेक करणे एवढे एकच काम कॉंग्रेसकडे उरले आहे.
मोदी पंतप्रधान व्हावेत, ही सगळ्यांचीच इच्छा असल्याचे वक्तव्य करणाऱया भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी नाव न घेता टीका केली होती. त्याचाही समाचार मोदी यांनी आपल्या सभेत घेतला. जिथे तुम्हाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार नाही, ती कसली लोकशाही? आता कॉंग्रेस हिटलरसारखे वागत नाहीये का? कॉंग्रेसच्या नेत्यांचे हे वागणे लोकशाहीविरोधी नाही का?, असा सवाल मोदी यांनी केला. कॉंग्रेसमुक्त भारत निर्माण करण्याची वेळ आली असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.