देशातील सत्तांतर एका ‘क्लिक’वर झाले, असे गमतीने बोलले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्य आहेच. कारण इंटरनेटवरून समाजमाध्यमांचा वापर करीत प्रचाराची नेटधुमाळी उडाली होती. सत्तांतरानंतरही अद्ययावत माध्यमांचा आधार भारतीय जनता पक्षाने सोडला नसून सदस्य नोंदणीसाठीही मोबाइल क्रमांकावर मिस कॉल द्यायचा नवा मार्ग चोखाळला आहे. भाजपच्या या प्रचारी पाऊलावर पाऊल टाकत काँग्रेसनेही ‘नेटा’ने प्रयत्न सुरू केले असून जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधात रणशिंग फुंकताना ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट जमीनवापसी डॉट कॉम’ ही वेबसाइट सुरू केली आहे.
या विधेयकाविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची रविवारी शेतकरी रॅली होणार आहे. या रॅलीच्या आदल्याच दिवशी हे संकेतस्थळ सुरू झाले आहे. इंग्रजी आणि हिंदूीत असलेल्या या संकेतस्थळाद्वारे या मोहीमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना केवळ एका मोबाइल क्रमांकावरून पाठिंबा नोंदवता येणार आहे. या माध्यमातून काँग्रेसने १८९४ पासूनच्या जमीन अधिग्रहण कायद्यांची तुलनात्मक मांडणी केली आहे, तसेच भाजपला आठ प्रश्नही विचारले आहेत. जमीन अधिग्रहणासाठी भाजप एवढा उतावीळ का आहे, हे अधिग्रहण नेमके कुणाच्या हितासाठी केले जात आहे, असे जळजळीत प्रश्नही काँग्रेसने केले आहेत.