काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अद्यापही सस्पेंस कायम आहे. दरम्यान, राहुल आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिल्यास पक्षाला अन्य पर्यांयांचा विचार करावा लागेल. तसेच सध्या काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडण्यावरही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

पक्षातील सद्यस्थिती पाहता एका वरिष्ठ नेत्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हंगामी अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून कॉलेजिअम असेल. त्यामध्ये काँग्रेसमधील दिग्गज चेहऱ्यांना स्थान देण्यात येऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) काँग्रेसचे नेते ए.के.अँटोनी राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच ते पक्षाच्या सद्यस्थितीवर चर्चा करतील माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. सध्या पक्ष स्तरावर यासंदर्भात कोणताही मोठा निर्णय घेण्यात आला नाही. तसेच राहुल गांधी यांना राजीनामा न देण्याची विनंती करण्यात आली आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. जर ते अध्यक्षपदी कायम राहिले, तर कोणताही मोठा बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे मत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले.

लोकसभेसाठी काँग्रेसचे गटनेते कोण असतील याची औपचारिक घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. यापूर्वी लोकसभेत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी कार्यसमितीच्या बैठकीत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. येत्या 17 जूनपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही लोकसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणून राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. गेल्यावेळी मल्लिकार्जून खरगे हे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते होते. परंतु यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पक्षाला गटनेत्याची निवड करावी लागणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची वेळ मागत आहेत. परंतु त्यांना राहुल गांधी यांनी भेटण्याची वेळ दिली नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.