राहुल गांधी यांची टीका; कार्यकर्त्यांशी संवाद
पंजाबमधील अमली पदार्थाच्या भीषण समस्येचा कायमस्वरूपी नि:पात करण्याबाबत शिरोमणी अकाली दल-भाजपचे सरकार गंभीर नाही, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे केला.

पंजाबमध्ये अमली पदार्थाचा प्रश्न गंभीर बनला आहे, मात्र अकाली दलाच्या सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे गांधी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. पुढील वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गांधी येथे आले आहेत.

पंजाबमधील अंमली पदार्थाचा प्रश्न आपण जेव्हा उपस्थित केला तेव्हा शिरोमणी अकाली दल आणि भाजपने त्याची खिल्ली उडविली, असे राहुल गांधी म्हणाले.

अमली पदार्थाच्या समस्येचा आरोप करणे हा पंजाबचा अवमान असल्याचा आरोप राज्य सरकारने केला त्याबाबत गांधी म्हणाले की, राज्याच्या प्रतिमेला कोणीही धक्का लावू शकत नाही, पंजाब हे देशाचे हृदय आहे, आपल्या हृदयातही पंजाबला स्थान आहे.

पंजाबमध्ये पुढील निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यास राज्यात झपाटय़ाने विकास होईल, आमच्या पक्षाचे सरकार आल्यावर अमली पदार्थाचा प्रश्नही मिटेल, जनतेच्या गरजांबाबत संवेदनक्षम असलेले नवे सरकार काँग्रेसला द्यावयाचे आहे, असेही ते म्हणाले.  मात्र सतलज-यमुना जोड कालव्याचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देऊन यांनी या बाबत भाष्य करणे टाळले.

निवडणूक रणनीती ठरविणारे प्रशांत किशोर यांच्या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठय़ा संख्येने हजर होते.

राहुल गांधी २० एप्रिलला अमेठीच्या दौऱ्यावर

अमेठी: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या २० एप्रिल रोजी आपल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या एक दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.काँग्रेसचे माजी विभाग अध्यक्ष भदर ओमप्रकाशसिंह यांचे गेल्या महिन्यात एका अपघातात निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राहुल गांधी त्यांचे सांत्वन करणार आहेत, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी सांगितले. त्यानंतर दिल्लीला परतण्यापूर्वी राहुल गांधी मिश्रा यांच्या निवासस्थानी एका खासगी कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.