मध्य प्रदेशात काँग्रेसला १२६ जागा मिळून त्यांची सत्ता येईल असा अंदाज एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार मध्यप्रदेशात भाजपाला ९४ जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर इतर पक्षांना १० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतो आहे. मध्य प्रदेश राखण्यासाठी भाजपाने निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात दुरंगी लढत या ठिकाणी बघायला मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मध्यप्रदेशात अनेक सभा घेऊन सत्ता राखण्याचं मतदारांना आवाहन केलं होतं. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता पालट झालाच पाहिजे असं आवाहन करत शिवराज सरकारला सत्तेवरून पायउतार करा असे आवाहन जनतेला केले होते. एबीपी, लोकनीती आणि सीएसडीच्या एक्झिट पोलच्या सर्वेनुसार लोकांनी राहुल गांधींचे आवाहन ऐकल्याचे दिसते आहे. मध्यप्रदेशात २३० जागांसाठी मतदान झाले. बहुमताचा आकडा ११६ असा आहे. एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात काँग्रेसची एकहाती सत्ता येईल असा अंदाज व्यक्त होतो आहे.

पाच राज्यांचे निवडणूक निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. त्यामध्ये कोणाला किती जागा मिळणार? कुठे सत्तापालट होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम, छत्तीसगढ आणि तेलंगण या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे. यामध्ये मतदारांनी कोणाला कौल दिला आहे हे निश्चित होणार आहे सध्या एबीपी लोकनीती आणि सीएसडीचा एक्झिट पोलनुसार मध्यप्रदेशात सत्ताबदल होऊन ही सत्ता भाजपाकडून काँग्रेसला मिळणार आहे असे दिसते आहे. असे झाले तर भाजपासाठी हा मोठा धक्का असणार आहे यात काहीही शंका नाही.