News Flash

काँग्रेसच्या अडचणीत भर, राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं पाठिंबा काढला

शरद पवारांनी कोणालाही साथ न देण्याची भूमिका घेतल्यानं काँग्रेसच्या अडचणी वाढल्या

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या राज्यसभा निवडणुकांकडे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसची नय्या पार होणार नाही असंच दिसून येतं आहे. कारण आता राष्ट्रवादीनंही आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल पाचव्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि भाजप त्यांना हरविण्यासाठी साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरत आहे. आता शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत आम्ही कोणाच्याही सोबत नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ही निवडणूक ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकांमध्ये आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे शरद पवार यांनी मात्र कोणासोबतच जाणार नाही असं जाहीर करून टाकलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

काँग्रेसचे जे आमदार आमच्यासोबत आले आहेत त्यांचा काँग्रेसवर विश्वास उरला नाही असा ट्विट गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केला आहे.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं काँग्रेसला साथ दिली होती. मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं पाठिंबा काढल्यातच जमा आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीनं घेतलेल्या या भूमिकेमुळे काँग्रेसची हायकमांडची चिंता वाढली आहे. काँग्रेस अडचणींत असताना अनेकदा शरद पवार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. यावेळी मात्र शरद पवारांनी कोणालाही साथ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

अहमद पटेल यांना विजयासाठी ४५ मतांची गरज आहे. अशात आता त्यांना राज्यभेची खासदारकी मिळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गुजरातमध्ये काँग्रेसचे ५७ आमदार होते ज्यापैकी ६ जणांनी राजीनामा दिला आहे, उरलेल्या ५१ पैकी ४४ आमदार हे बंगळुरूमध्ये गेले आहेत. मात्र इतर ७ आमदार तिथे पोहचलेले नाहीत, हे ७ आमदारही बंडखोरीच्या तयारीत आहेत त्यामुळे अहमद पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसल्यानंतर गुजरातमध्ये पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक रंगते आहे.

मागील तीन वर्षात गुजरातमध्ये भाजपचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे, पाटीदार समाजाचं आंदोलन आणि इतर मुद्द्यांमुळे भाजप हा पक्ष काहीसा बॅकफूटवर गेला आहे. याच परिस्थितीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. मात्र भाजपला हे होऊ द्यायचं नाही त्याचमुळे अहमद पटेलांच्या अडचणी वाढविण्याचं काम भाजपकडून होताना दिसतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 2:24 pm

Web Title: congress woes continue as ncp keeps them guessing in gujarat rs polls
टॅग : Congress,Ncp
Next Stories
1 तोटा भरुन काढण्यासाठी रेल्वेला अनुदान देण्याचे पंतप्रधान कार्यालयाचे अर्थमंत्रालयाला आदेश
2 पाकिस्तानच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना भारताचा थंड प्रतिसाद- ख्वाजा आसिफ
3 पूनम महाजन- रजनीकांतच्या भेटीवरुन राजकीय खलबत
Just Now!
X