प्रियंकांविरुद्ध द्वेषमूलक प्रचार

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी-वढेरा यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध करण्यात येत असलेल्या द्वेषमूलक प्रचाराविरुद्ध सोमवारी सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात येणार आहे, असे महिला आघाडीच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी शनिवारी येथे सांगितले.

प्रियंका गांधी-वढेरा यांची उत्तर प्रदेशच्या (पूर्व) प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध अपमानकारक वक्तव्ये केली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपच्या नेत्यांनी प्रियंका गांधी-वढेरा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे आपल्याला वेदना झाल्याचे देव यांनी म्हटले आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी आपण एफआयआर दाखल करणार आहोत, सर्व राज्यांमधील अध्यक्षांनी राज्याच्या राजधानीमध्ये एफआयआर नोंदवावा, असे देव यांनी म्हटले आहे. राज्याच्या राजधानीतील पोलीस अधिकारी एफआयआर नोंदवतील आणि या अपप्रचारामागे जे आहेत त्यांच्यावर कारवाई करतील, अशी अपेक्षा असल्याचे देव म्हणाल्या.

प्रियंका या सुंदर आहेत, मात्र त्यामुळे मते मिळत नाहीत, असे विधान बिहारचे मंत्री आणि भाजपचे नेते विनोद नारायण झा यांनी अलीकडेच केले होते. भाजपचे नेते विजयवर्गीय यांनी ‘चॉकलेटी’ चेहरा असा उल्लेख केला होता, तर भाजप आमदार सुरेंद्रसिंह यांनी प्रियंका यांची तुलना ‘शूर्पणखे’शी केली होती.