काँग्रेसच्या सरचिटणीस व लोकसभा निवडणुकीसाठी पुर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणुन जबाबदारी देण्यात आलेल्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी बुधवारी लोकसभा निडवणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा ठपका कार्यकर्त्यांवर ठेवला. कार्यकर्त्यांनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी आपले पुर्णपणे योगदान दिले नाही. त्यामुळेच काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागेल असे प्रियंका यांनी म्हटले आहे. मात्र, यानंतर त्यांनी कार्यकर्तांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागण्याचेही आव्हान केले.

रायबरेली येथील काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी प्रियंका बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मला या ठिकाणी कोणतेही भाषण करण्याची इच्छा नव्हती, पण तरी देखील मी बोलण्यास तयार केल्याने आता मला खर बोलु द्या आणि खर हे आहे की या ठिकाणची निवडणुक ही सोनिया गांधी व रायबरेलीच्या जनतेमुळे जिंकता आली आहे. काहीशा निराश दिसलेल्या प्रियंका या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींचा विजय झाल्यानिमित्त अभिवादन रॅलीसाठी आल्या होत्या. यावेळी प्रियंकांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम न करणा-यांची नावे त्या नक्कीच शोधुन काढतील, असेही सांगितले.

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निडवणुक निकालानंतर रायबरेलीस भेट दिली होती. तेव्हा त्यांनी भाजपावर टीका करत म्हटले होते की, ही निवडणुक जिंकण्यासाठी सर्व प्रकारच्या रणनीतींचा अवलंब केला गेला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारच्या पद्धती वापरल्या जात होत्या, निवडणुकीत जे घडले ते नैतिक होते की अनैतिक हे प्रत्येकाला माहिती आहे. मला असे वाटते हे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे की, सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रतिष्ठेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या.