लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर कॉंग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक मंगळवारी नवी दिल्लीमध्ये पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बैठकीमध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे पक्षाचे नेते आर. के. धवन यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकारिणीतील अनेक ज्येष्ठ सदस्यांनी पक्षाची धुरा राहुल गांधी यांच्याकडे देण्याची मागणी केली होती. पण कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
बैठकीसाठी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्यासह विविध राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी, दिग्विजय सिंह आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी थेटपणे बैठकीपूर्वी राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष करण्याची मागणी केली होती. राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी बैठकीला जाण्यापू्र्वी दिग्विजयसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना केली होती. राहुल गांधी सध्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे कॉंग्रेस महासमितीची संपूर्ण जबाबदारी देण्यात यावी, असेही ते म्हणाले होते.