गोवा, कर्नाटक, तेलंगणानंतर महाराष्ट्र, हरयाणातही पक्षांतराची भीती

मुंबई : गोवा, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधील आमदारांनी भाजप वा प्रादेशिक पक्षाची वाट पत्करल्याने काँग्रेस पक्षात चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच विधानसभेची निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्र आणि हरयाणात पक्षांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षांतर रोखायचे कसे, असा प्रश्न पक्षाला भेडसावत आहे.

कर्नाटकातील आमदारांचे राजीनामा नाटय़ सुरू असतानाच गोव्यातील पक्षाच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गोवा आणि कर्नाटकातील राजकीय घडामोडींमुळे पक्षाचे नेते सावध झाले आहेत. काँग्रेस पक्षात आधीच नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचा उत्ताराधिकारी नेमण्याचा प्रश्न अजूनही चर्चेतच आहे.  अध्यक्षपदावरून पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पक्षात निर्णय कोणी घ्यायचा हा प्रश्न आहेच.

लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगणातील पक्षाच्या आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. परिणामी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले. कर्नाटकातील आमदारांच्या राजीनामा नाटय़ावर अद्याप पडदा पडलेला नाही. दररोज राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. यातच गोव्यातील आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अन्य लोकप्रतिनिधींमध्ये चलबिचल सुरू होणार आहे.

महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला. आणखीही काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

आमिषे आणि धाकदपटशा दाखवून काँग्रेस आमदारांचे पक्षांतर केले जात आहे. पैशांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात आहे. सत्ताधारी भाजप सत्तेचा गैरवापर करीत असल्याचे गोव्यातील घडामोडींवरून स्पष्ट झाले. कर्नाटकातील आमदारांची भेट घेण्यासाठी गेलेल्या डी. के. शिवकुमार यांना मुंबईत पोलिसांनी रोखले. यावरून महाराष्ट्रातील भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेचा वापर केला होता, हे सिद्ध होते.

मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस, काँग्रेस