काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा; भाजपमध्ये दाखल

गोवा काँग्रेसमधील दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर हे दोन आमदार भाजपच्या डेऱ्यात सामील झाल्याने राज्यात सरकार स्थापनेच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. मंगळवारी सकाळी या दोन्ही आमदारांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. यादोघांनी आमदारकीचा राजीनामा देऊन दिवसअखेर अधिकृतपणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर प्रकृती अधिकच खालावल्यामुळे ते पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील सत्तासमीकरणात गेल्या दोन दिवसांत वेगवान घडामोडी घडत आहेत.

पर्रिकर यांच्या जागी विद्यमान आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांना मुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांना भाजपमधून तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून पाठिंबा मिळेलच असे नाही. त्यामुळे पुरेसे संख्याबळ राहावे यासाठी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी करण्यात भाजपला यश आले आहे. त्याचसाठी दोन आमदारांना भाजपमध्ये आणण्यात आले आहे. काँग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देऊन गोव्यात काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलावले जावे आणि तशी सूचना राज्यपाल मृदुला सिन्हा यांना करावी अशी विनंती केली होती. काँग्रेस सत्तास्थापण्यासाठी पक्ष आमदारांना एकत्र करत असल्याने सत्तेला धोका पोहोचू नये याची खबरदारी भाजपने घेतली. त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री सोपटे आणि शिरोडकर यांना घेऊन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक दिल्लीत आले. दोघांच्याही भाजपप्रवेशावेळी नाईक, विश्वजीत राणे आणि गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर उपस्थित होते.

पर्रिकर यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडली तर त्यांचा उत्तराधिकारी कोण?  याबाबत भाजपमध्ये मतभेद आहेत. अशा परिस्थितीत गोव्यातील भाजपच्या सत्तेला काँग्रेसकडून आव्हान मिळू शकते. हे लक्षात घेऊन काँग्रेसच्या दोन आमदारांना फोडण्याची यशस्वी खेळी भाजपने केल्याचे सांगितले जाते.

गोव्यातील सद्य:स्थिती

गोव्यातील ४० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसकडे १६ आमदार होते आणि भाजपकडे १४ सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे काँग्रेस सर्वाधिक सदस्यांचा पक्ष होता. मात्र, सोपटे आणि शिरोडकर यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची सदस्य संख्या १४ झाली आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असल्याची अनुकूलताही काँग्रेसने गमावली आहे. भाजपला मगोप आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या प्रत्येकी तीन अशा सहा आमदारांचा पाठिंबा आहे. त्याशिवाय, तीन अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक अशा चार आमदारांनाही भाजपची पाठराखण केली आहे.

पर्रिकर यांची प्रकृती अधिकच खालावली

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती अधिकच खालावली आहे.  दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांना रविवारी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. सध्या गोव्यातील त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.