फेसबुक सत्तारूढ भाजपला अनुकूलता दर्शवत असल्याच्या सातत्याने तक्रारी येत असून त्यासंदर्भात कोणती पावले उचलण्यात येत आहेत, अशी विचारणा काँग्रेसने फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झकरबर्ग यांच्याकडे शनिवारी एका पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसने एकाच महिन्यात दुसऱ्यांदा फेसबुकला पत्र लिहिले आहे.

केंद्रातील सत्तारूढ भाजप आणि फेसबुकचे कर्मचारी यांच्यातील कथित संबंधांचा संसदेच्या संयुक्त समितीद्वारे तपास करावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी एका पत्रकार परिषदेत केली. एका इंग्रजी मासिकात आलेल्या लेखाचा आधार घेऊन काँग्रेसने झकरबर्ग यांना पत्र पाठविले आहे. भाजप आणि फेसबुक इंडिया यांच्यात लागेबांधे असल्याचे पुरावे आणि अन्य माहिती त्या लेखातून उघड झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

याबाबत फेसबुक अथवा भाजपकडून त्वरित प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालातही हाच आरोप करण्यात आला होता. मात्र त्यावेळी फेसबुक आणि भाजपने त्याचे त्वरित जोरदार खंडन केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप आणि भाजपमध्ये लागेबांधे असल्याचे उघड झाले आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एका इंग्रजी मासिकाचा अहवाल टॅग करून केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर ४० कोटी भारतीय करतात, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर देयके देण्यासाठीही व्हावा अशी इच्छा आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अनुमतीची गरज आहे आणि त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप भाजपच्या ताब्यात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हुकूमशाहीचा वाढता प्रभाव : सोनिया गांधी

रायपूर : देशविरोधी  शक्ती  तिरस्काराचे विष पसरवत आहेत. लोकशाहीवरील हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे, असे सोनिया गांधी यांनी शनिवारी म्हटले आहे.

‘आझाद यांना हाकला’ 

लखनऊ : काँग्रेस पक्षसंघटनेच्या फेररचनेची मागणी करणाऱ्या पत्रावर हस्ताक्षर असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी  माजी आमदार नसीब  पठाण यांनी केली आहे.