करोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेलेली असताना पेट्रोल डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सलग दहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढल्यानं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. इंधन दरवाढीचा निर्णय असंवेदनशील असल्याचं सांगत महामारीच्या काळात लोकांच्या समस्यांमध्ये भर घालणारी इंधन दरवाढ परत घ्यावी, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

देश सध्या करोनाच्या संकटातून जात असताना इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांच्या समस्यांमध्ये भर घातली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असून, यासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. “केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करून २ लाख ६० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांनी आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा पंतप्रधान व्यक्त करत असताना अशा संकटात लोकांवर आर्थिक भार लादणे योग्य नाही. सध्याच्या करोना महामारी विरोधातील लढाईच्या काळात देशाला आरोग्या संबंधी तसेच आर्थिक व सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मला या गोष्टी खंत वाटते की, अशा संकटाच्या काळात सरकारनं पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्याचा असंवेदशील निर्णय घेतला”, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “नरेंद्र मोदी-अमित शाहजी, ज्यांनी तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचवलं, ते लोक आज मरत आहेत”

“देशातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा आहे. छोटे, मध्यम व मोठे उद्योग बंद होऊ लागले आहे. शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं कारण कळत नाही. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत ९ टक्क्यांची घट झाली आहे. तरीही सरकार संकटाच्या काळात लोकांना याचा लाभ देण्यासाठी काही करत नाहीये,” असा दावा गांधी यांनी केला.

“माझी तुम्हाला विनंती आहे की, ही इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा फायदा थेट देशातील नागरिकांना दिला जावा. जर तुम्हाला लोकांनी आत्मनिर्भर व्हावं असं वाटत असेल, तर त्यांच्या पुढे जाण्याच्या मार्गात आर्थिक अडथळे आणू नका. मी पुन्हा एकदा सांगते की जे लोक या कठीण प्रसंगातून जात आहेत, थेट त्यांच्या हातात पैसे द्यावे,” असं सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.