मेघालय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भलेही सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी ते सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले नाही. एनपीपी नेते कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपी-भाजपा युतीने राज्यात सरकार बनवण्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोनराड संगमा मंगळवारी (६ मार्च) सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

यापूर्वी शनिवारी रात्री मेघालय काँग्रेसचे अध्यक्ष विन्सेंट पाला आणि पक्षाचे महासचिव सी. पी. जोशी यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर कोनराड संगमा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, युतीचे सरकार चालवणे देखील सोपे नसते. लोकांना चांगले सरकार देणे हीच आमची प्राथमिकता असायला हवी. त्याचबरोबर आसामचे अर्थमंत्री नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायंस (एनईडीए) चे हेमंत बिसवा शर्मा यांनी सांगितले की, राज्यात कोणीही उपमुख्यमंत्री असणार नाही. प्रत्येक पक्षाच्या दोन आमदारांपैकी एक जण सरकारमध्ये मंत्री असेल. त्यामुळे भाजपचे दोन आमदार असल्याने त्यांचाही सरकारमध्ये समावेश असेल.

एनपीपी-भाजपा युतीतील सत्तेचे समीकरण :

भाजपा-एनपीपी यांच्या युती सरकारमध्ये युडीपीचे ६, एनपीपीचे १९, पीडीएफचे ४, एचएसपीडीपीचे २, भाजपाचे २ आणि १ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस राज्यात सर्वाधिक २१ जागा जिंकलेला पक्ष आहे. मात्र, बहुमताचा ३१ हा आकडा पार करण्यासाठी त्यांना मित्रपक्षांना सोबत घेता आले नाही, त्यामुळे त्यांनी सत्तेत सहभागी होण्याची संधी गमावली.