पूर्व लडाखमध्ये गेल्या सात आठवडय़ांपासून सुरू असलेला तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास चर्चा झाली. तणाव दूर करण्यासाठी दोन्ही बाजूंनी ‘जलद गतीने व टप्प्याटप्प्याने’ पावले उचलण्याच्या आवश्यकतेवर या चर्चेत मतैक्य झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

ही चर्चा प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारतीय बाजूने पूर्व लडाखमधील चुशुल सेक्टरमध्ये झाली. भारतीय बाजूचे नेतृत्व १४ कॉर्प्सचे कमांडर ले.ज. हरिंदरसिंग यांनी, तर चिनी बाजूचे नेतृत्व तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे मेजर जनरल लिउ लिन यांनी केले. ताबा रेषेवरील तणाव कमी करण्याबाबत दोन्ही बाजूंच्या बांधिलकीचे या चर्चेत प्रतिबिंब उमटले. ही एकूण परिस्थिती जबाबदारीने हाताळली जावी, याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व त्यांचे चिनी समपदस्थ वांग यी यांच्यात १७ जूनला दूरध्वनीवर झालेल्या संभाषणात सहमती झाली होती. त्यानुसारच मंगळवारी कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीत ही घडामोड झाली. सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया ‘गुंतागुंतीची’ असल्यामुळे, अशा संदर्भात काल्पनिक आणि निराधार वृत्ते टाळली जावीत, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या लडाख दौऱ्यावर

दोन्ही बाजूंना मान्य असलेला तोडगा काढण्यासाठी लष्करी व राजनैतिक अशा दोन्ही स्तरांवर आणखी बैठकी होण्याची अपेक्षा आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लडाखला भेट देणार आहेत. या वेळी ते सीमेवरील स्थितीचा आढावा घेऊन लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या वेळी लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि उत्तर लष्कर कमांडर ले.ज. वाय.के. जोशी उपस्थित असतील.