पंतप्रधानांची श्रमिकांना दिलासा देण्याची ग्वाही

नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिली. करोनामुळे लाखो स्थलांतरितांना विविध प्रकारच्या हालअपेष्टा, आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याची दखल घेताना मोदींनी स्थलांतरितांसाठी आयोग नेमण्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर सविस्तर चर्चा केली जात असल्याचे सांगितले.

मजुरांकडे कोणत्या प्रकारचे कौशल्ये आहेत, याची माहिती घेण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी काही नवउद्यमी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर स्थलांतरित मजुरांसाठी आयोग नियुक्त करण्याचा विचार केला जात आहे, असे मोदी म्हणाले. करोनामुळे शहरांतील रोजगारावर गदा आल्याने स्थलांतरित मजूर गावी निघून गेले आहेत. तिथे त्यांना रोजगाराची तसेच, स्वयंरोजगाराची संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावांमध्ये लघुउद्योग सुरू करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात असल्याचे मोदी सांगितले.

मोदी म्हणाले की, करोनाचा सर्वाधिक फटका गरिबांना, कष्टकऱ्यांना बसला आहे. त्यांना वेदना भोगाव्या लागल्या. त्यांचे दुख आपल्या सगळ्यांच्याच मनाला भिडले आहे. त्यांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला असता तर त्यांची वणवण झाली नसती. यापुढे आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्थानिक उत्पादनांना देशांतर्गतच नव्हे जगभरात बाजारपेठ निर्माण करावी लागेल. ‘मेक इन इंडिया’ला प्राधान्य द्यावे लागेल. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असून आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. पण, करोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे सतर्क राहिलेच पाहिजे. अंतरसोवळयाचे पालन, मास्क वापरा, शक्य असेल तर घरात राहून काम करा. स्थलांतरित मजुरांना रेल्वेने मदत केली असून रेल्वेच्या कर्मचारीही करोनाच्या लढय़ातील योद्धे असल्याचे मोदी म्हणाले. रेल्वे कर्मचारी लाखो मजुरांना सुरक्षित आपापल्या राज्यांत घेऊन गेले. त्यांना प्रवासात जेवणखाणे दिले.

नाशिकच्या राजेंद्र जाधव यांचा विशेष उल्लेख

नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचा मोदींनी विशेष उल्लेख केला. नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरचा वापर करून विषाणूरोधक फवारणी यंत्राची निर्मिती केली. स्वखर्चाने तयार केलेल्या या यंत्राद्वारे त्यांनी त्यांच्या परिसरात फवारणी केली. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे मोदींनी कौतुक केले. जाधव यांच्यासारख्या अनेक लोकांनी आपापल्या परीने करोनाविरोधात लढा दिला असल्याचे मोदी म्हणाले.