काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यात भारतविरोधी घटकांसोबत कारस्थान करतात, असा आरोप करून बुधवारी भाजपने त्यांच्यावर हल्ला चढवला.

‘आम्ही एक आहोत. प्रचारतंत्र आणि खोटय़ा कथा यांच्या माध्यमातून भारताची प्रतिमा मलीन करण्याच्या सर्व प्रयत्नांच्या विरोधात आम्ही एकत्र उभे आहोत’, असे ट्वीट भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले.

‘भारताची बदनामी कशी करावी आणि या देशाला वादात कसे ओढावे याबाबत भारतविरोधी घटकांसोबत कारस्थान रचण्यासाठी राहुल गांधी  विदेशात जातात’, अशी टीका  भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत केली.

आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना असो, माजी अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफा असो किंवा या मुद्दय़ावर ट्वीट केलेले इतर लोक असोत; त्यांची राहुल गांधी भारतविरोधी प्रचारासाठी भेट घेतात, असाही दावा पात्रा यांनी केला.

या पत्रकार परिषदेचे शीर्षक ‘राहुल, रिहाना व रॅकेट’ असे असल्याचे सांगून, राहुल गांधी हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उपयोग राजकीय हितांसाठी करत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला. आपले राजकारणाशी काही देणेघेणे नसल्याचे शेतकरी म्हणत आहेत याकडे लक्ष वेधतानाच, शेतकऱ्यांच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न करून राहुल यांनी त्यांची ‘अपरिपक्वता’ दाखवली आहे, असे ते म्हणाले.